ग्प्रदीप अंभोरे ग्न
छत्रपती संभाजीनगर : मागच्या आठवड्यात नायलॉन मांजाने दोन जणांचे गळे कापले. उद्या मकरसंक्रात असल्याने पतंगबाजी मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि काटाकाटीसाठी नायलॉन मांजाचा व काच लावून तयार केलेल्या मांजाचा वापर होणार आहे. छुप्या पद्धतीने त्याची विक्रीही होत आहे. हाच नायलॉन मांजा कोंबडी कापावी इतक्या क्रूरतेने गळे कापतो. मानवासोबतच पक्ष्यांसाठीही मांजा धोकादायक आहे. दरवर्षी मानवासह अनेक पक्ष्यांचा जीव जातो.
पतंगबाजीला ऐतिहासिक महत्त्व आहे. तो एक सांस्कृतिक सोहळा होता, परंतु आता एकमेकांचे पतंग काटण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणार्या नायलॉन दोर्याला काचेची भुकटी लावून तो अधिक धारदार केला जातो. याबाबत कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. विक्रांत वझे यांनी सांगितले की, नायलॉन मांजासह काच लावलेला मांजा गळ्यासाठी अत्यंत घातक आहे. वेगात असलेल्या दुचाकीस्वारांच्या गळ्याला वेटोळा पडून गळा जोरात आवळला जातो आणि गळ्याला मोठी जखम होऊन रक्तस्राव होतो. जखम खोल असेल तर गळ्यावरच्या नसा कापल्या जाऊन प्रसंगी जीवही जाऊ शकतो. मांजा डोळ्याला लागला तर डोळा निकामी होऊ शकतो. कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
सुती दोर्याचा वापर करावा
पतंगाची काटाकाटी करण्यापेक्षा निखळ पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी साध्या सुती दोर्याचा वापर करावा. शहराच्या गर्दीत आणि रस्त्यांवर पतंग उडवण्यापेक्षा मोकळ्या मैदानात किंवा निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासह पतंगबाजी करा. मुलांना घरीच पतंग तयार करण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे, जेणेकरून त्यांना सर्जनशीलता कळेल.















